गुरू विना ज्ञान सांग कैसे? - डॉ अमित वामन नेमाणे

 मित्रांनो, आज आषाढी पौर्णिमा! आपण आषाढी पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतो. याच दिवशी आपण गुरुपौर्णिमा देखील साजरी करतो. आपण अगदी लहानपणापासून ,शाळेत असल्यापासून ,गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाषणे ऐकले असतीलच किंबहुना केली देखील असतील. गुरूंचे जीवनात असलेले महत्त्व , आपण बऱ्याचदा वाचले आहे किंवा अनुभवले देखील आहे किंवा त्यावर आपण चिंतन देखील केले असेल. गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपण भाषण देताना केलेल्या तयारीमध्ये वाचल्या देखील असतील, परंतु मित्रांनो एवढ्या वरतीच गुरुपौर्णिमा संपविता येईल का? गुरु पौर्णिमेचे महत्व ,हे अगदी बोली भाषेमध्ये मांडायचे असेल तर ते आपल्या अधिक समजेल ,असे मला वाटते , केवळ त्याच त्या भाषांमध्ये त्याच त्या प्रत्येक वर्षीच्या गुरुपौर्णिमेस वाचलेली तीच ती माहिती पुन्हा पुन्हा वाचणे सांगणे किंवा ऐकणे हे थोडेसे प्रभावहीन जाणवते! अशा परिस्थितीमध्ये आपण उर्वरित लेखाकडे पाहुयात,


     मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना आपण एक रेफरन्स पॉईंट कायम डोक्यात ठेवत असतो. त्या रेफरन्स पॉईंटला उद्देशून किंवा प्रमाण मानून आपण स्वतःचे किंवा आपण केलेल्या कृत्याचे अवलोकन करीत असतो. अगदी जन्मापासून व्यक्ती कोणा न कोणाचे अनुकरण करत असते, थोडक्यात एखाद्या गोष्टीच्या रेफरन्स शी तुलना करून आपले कार्य करत असते .बऱ्याचदा हा रेफरन्स किंवा रेफरन्स पॉईंट हे एखादे पुस्तक, एखादी परंपरा, एखादी व्यक्ती किंवा एखादा अनुभव असते, याचाच अर्थ हा रेफरन्स म्हणजेच गुरु ! आणि गुरु म्हणजेच प्रमाण! आणखी सोप्या भाषेत आपण जाणून घेऊयात.... रसायन शास्त्रामध्ये कुठलाही प्रयोग करताना त्या प्रयोगामध्ये स्टॅंडर्ड मोजमाप हा पूर्वीच नोंदवलेला असतो आणि आपण सतत वेगवेगळे प्रयोग करून त्या नोंदवलेल्या मोजमापाशी त्याची तुलना करीत असतो ,याचाच अर्थ आपण त्या स्टॅंडर्ड मोजमापाला गुरुस्थानी ठेवीत असतो किंवा जगामध्ये कुठलेही शोध ,कुठलीही प्रमेय ही एका प्रमाण मानलेल्या गोष्टींपासून सुरू होतात ,म्हणजेच हा प्रमाण गुरू होय ! मित्रांनो आपण आयुष्य जगत असताना नेहमीच बरोबर असतो किंवा शंभर टक्के बरोबर असतो असे होऊ शकत नाही .त्यामुळे जे आपण करतो ते सर्व काही योग्य असेलच असे नाही. बऱ्याचदा सर्वोच्च ज्ञान प्राप्त व्यक्ती किंवा अनुभव संपन्न व्यक्ती देखील कुठेतरी येऊन थबकते! अशा परिस्थितीमध्ये मार्गदर्शनाची नितांत गरज भासते आणि ते मार्गदर्शन हे गुरु शिवाय शक्य नाही .ज्ञानप्राप्तीसाठी गुरु असणे हे प्रचंड महत्वाचे असते. गुरु विना ज्ञान म्हणजे दुधारी तलवारी सारखे असते. गुरु नसलेला ज्ञानी व्यक्ती हा समाजासाठी विघातक ठरण्याची शक्यता जास्त असते !! गुरु हा आपल्याला केवळ ज्ञानप्राप्तीसाठी मदत करत नाही, परंतु प्राप्त झालेल्या ज्ञाना पासून जीवन व्यापण करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. गुरु नसलेली व्यक्ती हे दिशा नसलेल्या बोटीसारखी असते ,बोटीची क्षमता कितीही जास्त असली तरी देखील त्याला किनारा शोधण्यासाठी किंवा किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते ,तेच काम गुरु करत असतो ! व्यक्तिमत्व ज्ञानी असू शकते, मेहनत करण्याची इच्छा असू शकते, मात्र त्याला दिशा असणे हे फार गरजेचे असते आणि तेच काम गुरु करीत असतो !

      मित्रांनो गुरु अनेक स्वरूपांमध्ये असतो आपण वाचत असलेली पुस्तके ,आपण संपर्कात असलेले काही लोक, आपले मित्रमंडळी, सर्वप्रथम आपल्या आई वडील ,आपले नातेवाईक ,आपली पत्नी ,आपली मुले यांत कोणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुरू स्वरूप असतो. अगदी लहान बाळ देखील आपल्याला निरागसता शिकवते! आई-वडिलांपासून समर्पण शिकाव्यास मिळते. मित्रांपासून स्वार्थहीन सहकार्य शिकावयास मिळते .पुस्तकांपासून, वाचनातून ज्ञान अर्जित होते हे सर्व आपले गुरु असतात आणि गुरूंचे महत्त्व जाणणे म्हणजेच अंगी असलेली नम्रता! याचे दर्शन होते. नम्रते शिवाय ज्ञानाला शोभा नाही. जगातला सर्वात जास्त ज्ञानी व्यक्ती हा त्याच्या ज्ञानापेक्षा जास्त नम्रतेने ओळखला जातो. ज्ञानाचा गर्व असणे हे गुरुविण व्यक्तीचे लक्षण आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये कोणा एका व्यक्तीला प्रमाण मानणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर समुद्राला बांध नाही, नदीला बांध नाही तर हेच उपयोगी असलेले पाणी प्रलय माजवू शकते .आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे, यालाच व्यासपौर्णिमा म्हणतात ,याचे कारण महर्षी व्यास हे आहे, ज्या व्यासांनी महाभारत लिहिले अनेक पुराने लिहिली आणि हीच महाभारते आणि पुराणे आपल्या भारतीय संस्कृतीचे गुरु मानले जातात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावरती या महाभारताचा किंवा पुराणातील अनेक ग्रंथांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बराचसा प्रभाव असतो ,त्यामुळे आपण महर्षी व्यासांना जगद्गुरु देखील संबोधतो. हीच गुरु शिष्य परंपरा पुढे जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे .हे नाते टिकवणे, हे गुरु आणि शिष्य या दोघांचे काम आहे .जर आपण हे नाते टिकवू शकलात, त्याला प्रगल्भता देऊ शकलात तर भारत देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ होण्यास वेळ लागणार नाही. आजच्या रोजच्या जीवनामध्ये अनेक लोकांना गुरुचे महत्व हे तितकेसे माहित नाही किंबहुना गुरु नसलेले अनेक लोक किंवा गुरुची महती माहीत नसलेले अनेक लोक आहेत. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी कोणालाही योग्य व्यक्तीला प्रमाण म्हणून त्याला गुरुस्थानी ठेवणे फार गरजेचे आहे. तरच उर्वरित आयुष्य आपणास यश आणि ज्ञानप्राप्ती होईल हे या निमित्ताने सांगितल्यास वावगे ठरणार नाही.

 धन्यवाद 

डॉ अमित वामन नेमाने(लेखक , दंतरोग तज्ञ असून वक्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत)

Comments

  1. 👌👌👏👏💐💐kupach sundar

    ReplyDelete
  2. Very Good article Sir👍🏻👌🏻🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे