बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे

 " बदलते पालक आणि पालकत्व "

                                      

                             - डाॅ अमित वा नेमाणे 


नमस्कार मित्रांनो ! कोविड१९ च्या युगात , अचानक शरीरात प्रवेश केलेल्या मात्र अपेक्षित असलेल्या कोरोना विषाणू चा पाहुणचारात करन्यात मागचे काही दिवस गेल्याने, माझा कुठलाही लेख प्रसिद्ध होऊ शकला नाही .याबद्दल क्षमस्व!  अनेक वाचकांनी त्याबद्दल मध्यंतरी फोनवर विचारपूस देखील केली , त्याबद्दल आभार ! असो !!


    वाचक मित्रांनो ,मी गेले अनेक वर्ष मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक संस्था ,शाळा ,कंपन्यांमध्ये व्याख्याने देत आहे .मात्र शाळेमध्ये व्याख्यान देताना किंवा तिथल्या विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना किंवा त्यांच्या पालकांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि सतत जाणवत राहते . ते म्हणजे , ज्या वेगाने विद्यार्थ्यांचा ,पर्यायाने पाल्यांचा मानसिक विकास होतो आहे ,तो वेग अफाट आहे .मात्र त्या वेगाच्या तुलनेत पालकांना आपल्या भूमिकेत बदल करताना अनेक अडचणी येत आहेत . माझ्याकडे बरेच पालक प्रत्यक्ष येतात आणि त्यांची मुलांना सांभाळताना उडणाऱ्या भांबेरी चे वर्णन करता , दुःखी होतात . आज त्याच सर्व पालकांशी या लेखाच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

          पालक मित्रांनो ,पालकत्व हे नेहमी दुधारी तलवारीसारखे असते .ती जवाबदारी जेवढी आनंदाची , तेवढीच जिकिरीचे असते हे आपणा सर्वांना मान्य असेल, याबद्दल दुमत नसावे .परंतु मागच्या काही वर्षात मुलांचे वागणुकीचे स्वरूप प्रचंड बदललेले असल्याचे आपणास जाणवते आहे का ?नसेल , तर नक्की तुम्ही आपल्या पाल्यांचे अवलोकन करायला हवे आहे !! आपल्या लहानपणाच्या दाखल्यावर आत्ताच्या मुलांचे शेरे उमटविण्याची ही वेळ नाही आणि त्याची मुलांनी दखल घेण्याची सुतराम शक्यता नाही . तुम्ही तुमच्या बालपणी जसे होता आणि तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या या लहान वयात कसे वाढविता यात जमीन-अासमानचा फरक झाला आहे ,हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या.

    आपल्या काळी आपण बालवयात असताना , आपल्या अपेक्षा, महत्वकांक्षा फार वेगळ्या स्वरूपाच्या होत्या .सध्याच्या घडीला आपल्या मुलांच्या अपेक्षा , महत्वाकांक्षा ह्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत हे समजण्यासाठी एकाच फुट पट्टीचा किंवा मापदंडाचा वापर तुम्ही करत असाल , तर तुम्ही चुकत असल्याची शक्यता जास्त आहे . मुळात प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचा बौद्धिक आवाका सर्वप्रथम ओळखला पाहिजेल ,त्यानंतर मुलांच्या कलेने त्यांच्या भविष्यातील जडणघडणीचा ,आवडी निवडीची चर्चा केली पाहिजेल आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल त्याला प्रेरणा देऊन सतत या क्षेत्राबद्दल ची चर्चा ,माहिती ,शोधनिबंध त्याच्या समोर ठेवले पाहिजेत . एकंदर मुलांच्या आवडीच्या क्षेत्रा संदर्भात घरातील वातावरण तयार केले पाहिजे , मात्र त्याचे मित्र ,त्याचे खाणे पिणे ,त्याचे वागणे या सर्व क्षेत्रात त्याच्या आवडत्या विषयाचा त्याच्या आवडत्या गोष्टींचा संदर्भ तयार करणे आणि त्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला समजून सांगणे हे पालक म्हणून आपले काम असते.

      ऑफिस मध्ये बॉस ने दिलेल्या टारगेट प्रमाणे जर तुम्ही तुमच्या मुलांना गुणांचे ,करिअरचे टारगेट देणारा असाल तर तुमचा मुलगा टारगट निघण्याची शक्यता जास्त वाटते . प्रथम मुलांची आपापसातली तुलना आणि आपल्या त्याच्याकडून असलेल्या नाहक अपेक्षा आपण थांबवल्या पाहिजेल . विकसित होत असलेल्या किंवा येऊ घातलेले आणि टेक्नॉलॉजी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स फॅशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही मुलांना अगदी व्यवस्थित दिली पाहिजेल.त्या संदर्भात आपण त्यांचे नियमित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे अन्यथा जिथे तांत्रिक प्रगती अधिक असते तिथे तान तनाव शिगेला पोहोचतात .अनेक देशांमध्ये यापूर्वीही ते दिसून आले आहे .साऊथ कोरिया सारख्या महाराष्ट्र ऐवढा देश देखील भारताबरोबरच स्वतंत्र झाला , मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात अव्वल होऊन भारताला साऊथ कोरिया ने कधीच मागे टाकले आहे . मात्र याच उच्च तंत्रज्ञान असलेल्या  देशालाच सुसाइड कंट्री किंवा आत्महत्या चा देश म्हणून देखील कुप्रसिद्धी मिळाली ती याच तंत्रज्ञानाने , याचा अर्थ तंत्रज्ञान हे अनेक जबाबदाऱ्या घेऊन येते हे पुन्हा सिद्ध झाले आहे .तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेक मुलांचे यापूर्वी नुकसान झाल्याचे ऐकिवात आहे.

      बऱ्याचदा मुलांच्या शुल्लक गोष्टींवरून आत्महत्या सारख्या गोष्टी वर्तमानपत्रात आपण वाचतो . ती वेळ आपल्यावर नाही , समजून आपण त्याचा विचार मंथन करीत नाही . मुळात  एकविसाव्या शतकात "डिप्रेशन " नावाचा आजार जगात सर्वत्र झपाट्याने वाढतो आहे . डिप्रेशन म्हणजे काय ? , हे समजण्या पूर्वीच आपली मुले त्याचा अनुभव घेताना दिसत आहे .काही दिवसांपूर्वी इयत्ता चौथी म्हणजे जेमतेम आठ ते नऊ वर्षांच्या दोन मुलांचा संवाद ऐकला ,एक दुसऱ्याला म्हणतो की मी ह्या माझ्या गॅजेट च्या स्लो इंटरनेट मुळे मित्र डिप्रेशनमध्ये आहे रे .....!  आणि पुढील अर्धा तास ही मुले डिप्रेशन येणे , हे किती स्वाभाविक आहे यावर चर्चा करतात . आश्चर्य वाटते , जगाची झालेली ही प्रगती पालकत्वासाठी किती आव्हानात्मक आहे हे आपण ठरविले पाहिजे !!

    त्यामुळे सर्वसाधारण प्रत्येक पालकाने ही आपली पालकत्वाची जबाबदारी योग्य रित्या समजली पाहिजे .केवळ स्वतःचा आर्थिक ,मानसिक महत्त्वाकांक्षा पुढे आपल्या मुलांचा बळी दिला ,तर ह्या देशाचे भविष्य पुढे अंधारात असेल !! आज एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आहे . तरुणांचा देश म्हणून ते या सर्व मुलांकडे अपेक्षेने बघायचे , सतत मुलांशी संवाद साधायचे , मुलांवरती व्याख्याने द्यायचे . आपणही हेच केले पाहिजे ,मुलांशी संवाद साधला पाहिजे ,त्याला त्याच्या कलेने गोष्टी समजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला आवडत असलेल्या करिअरची वातावरण निर्मिती घरात करता आली पाहिजे , वेगवेगळी व्याख्याने ऐकली पाहिजे ,तशी मुलांनादेखील ऐकविली पाहिजे . आपला इतिहास समजला पाहिजे , मुलांमध्ये वाचनाची आवड तयार केली पाहिजे ,त्यापूर्वी आपणा स्वतःमध्ये आवड तयार करने गरजेचे आहे .अनेक थोर व्यक्तिमत्वांची भूमी असलेल्या या देशात , अनेक शूरवीर होऊन गेले , हे आजच्या पिढीतील आपल्या मुलांनी अभ्यासले पाहिजे , पाश्चात्य देशातील संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपल्या देशाची महान संस्कृतीचा अभ्यासने अधिक गरजेचे आहे . शिवाजी महाराज या भुमीवरती पुन्हा घडले पाहिजे ,अशी जर तुमची अपेक्षा असेल तर त्यापूर्वी आधी जिजाऊला घडावे लागणार आहे .  पालकांनी यासंदर्भात विचार केला तरच , मुलांचे भविष्य उज्वल आहे , ही समजण्याची हीच वेळ आहे.



डॉ अमित नेमाणे 

(व्याख्याते आणि दंतरोग तज्ञ)

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे