डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

 समाजामध्ये डॉक्टरांची संख्या जरी वाढली असली तरी आपणास योग्य डॉक्टर निवडण्याचे जनतेसमोर नवे आव्हान उभे आहे!! 


 नमस्कार मित्रांनो मी गेले अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करीत आहे . अनेक रुग्ण येतात वेगवेगळे बरे-वाईट अनुभव सांगतात ,आश्चर्यकारक किंवा तेवढेच चित्तथरारक रुग्णांचे अनुभव देखील ऐकावयास मिळतात .डॉक्टर मंडळी देखील एकत्र बसली की डॉक्टरांकडून अनेक अनुभव ऐकावयास मिळतात किंवा OPD मध्ये पेशंट वर देखील असे अनेक प्रसंग ओढावतात. मध्यंतरी डॉक्टरांवर होणाऱ्या काही हल्ले चिंताजनक आणि निशंक निषेधार्ह होतेच याबाबत तिळमात्र शंका नाही, मात्र रुग्णांच्या काही व्यथा देखील लक्षणीय आहेत . डॉक्टरांनी योग्य वेळी योग्य सल्ला न दिल्याने प्राण गमावलेले किंवा विकलांग झालेले रुग्ण देखील समाजामध्ये दिसतात, डॉक्टरांना देव मानणारा हा समाज बऱ्याचदा डॉक्टरांच्या चुकीमुळे डोळ्यातून पाणी गाळताना देखील दिसत असतो, अशा वेळी डॉक्टरांचा कोप वगैरे झाला का? असे म्हणावे का ? असा प्रश्न पडतो .परंतु रुग्ण मित्रांनो आपल्या वरती काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर योग्य डॉक्टर निवडणे फार गरजेचे असते, आपल्यावरती येणारी आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीची वाट बघणे हे कितपत योग्य आहे? आपण रहात असलेली जागा, आपले घर किंवा आपण जात असलेला परिसर येथे वैद्यकीय आपत्कालीन सुविधांची परिस्थिती काय आहे! वैद्यकीय सुसज्ज असे दवाखाने आपल्या परिसरात उपलब्ध आहेत का?! तितकेच निष्णात असे डॉक्‍टरांची तेथे उपलब्धता आहे का ?! या गोष्टी विषयीची माहिती आपण सर्वांनी नियमित घ्यायला हवी. अचानक आरोग्य विषयी तक्रार उद्भवल्या नंतर जर आपणास योग्य आणि सुसज्ज दवाखाना किंवा त्या योग्य विषयी तज्ञ असे डॉक्टर जर तात्काळ भेटले नाहीत तर आपणास आपल्या आरोग्याची मोठी किंमत मोजावी लागेल .डॉक्टरांवर विश्वास ठेवणे गैर नाही ,मात्र अंधविश्वास ठेवणे हे आपल्याला घातक ठरू शकेल! " सेकंड ओपिनियन " नावाची जी पद्धत नव्याने पाहायला मिळत आहे ,त्याचाही वापर करावयास हरकत नाही. 


      मित्रांनो कुठलाही वैद्यकिय पदवी प्राप्त डॉक्टर हा अयोग्य नसतो ,मात्र अनुभव हा वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वात मोठा गुरू असल्याचे पहावयास मिळत आहे, कदाचित त्याचमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या कामास " प्रॅक्टिस " असे म्हणत असावेत!! सध्याच्या युगामध्ये अनेक सुपर स्पेशलिटी असलेल्या डॉक्टरांची उपलब्धता आहे .पूर्वीच्या काळी केवळ वैद्यकिय पदवीका किंवा पदवीत्तोर पदवीका प्राप्त डॉक्टर सर्वत्र उपलब्ध होते, मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर सुपर स्पेश्यालीटी किंवा फेलोशिप असलेल्या अनेक डॉक्टर आज समाजात उपलब्ध आहेत. पदवीत्तर अभ्यासक्रमानंतर देखील सुपर स्पेशालिटी मध्ये अभ्यास केलेले डॉक्टर देखील समाजामध्ये उपलब्ध आहेत . पुर्वी जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये एखादा डॉक्टर हा सुपर स्पेशलिटी असलेला असायचा ,मात्र आजची परिस्थिती तशी नाही. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये सुपर स्पेशालिटी असलेले डॉक्टरांची संख्या भरगोस आहे. मात्र रुग्ण म्हणून आपण आपल्या आजारासाठी किंवा आपल्या आरोग्य विषयक अडचणींसाठी योग्य डॉक्टरांची निवड करणे हे फार गरजेचे असते .डॉक्टरांनी देखील आपल्या शिक्षण प्राप्त नसलेल्या क्षेत्रातील प्रॅक्टिस करणे हे कितपत योग्य आहे ?! हे स्वतःहून जाणले पाहिजे .मुळात अशा डॉक्टरांची संख्या ही कमीच असते ! मात्र रुग्ण मित्रांनो डॉक्टरांकडे जाताना डॉक्टरांचा अनुभव ,डॉक्टरांनी शिक्षण घेतलेली विद्यापीठ ,सरकारी आहे की खाजगी आहे ( खासगी शिक्षण संस्थां किंवा तेथिल डॉक्टरच्या विरोधात माझे मत कलुशित नाही ! ) किंवा डॉक्टरांबद्दल असलेल्या इतर रुग्णांचे अनुभव ,डॉक्टर प्रॅक्टिसमध्ये असल्याचा कालावधी ... इ ...या सर्व गोष्टींविषयी आपण विचार करूनच डॉक्टर निवडणे फार गरजेचे असते आणि या उपद्व्यापानंतर देखिल डॉक्टर एखाद्या रुग्णाला हवी तशी वैद्यकीय मदत करू शकले नाहीत, तर मुळात ,डॉक्टर अयोग्य होता असे विश्लेषण करणे हे योग्य नाही! डॉक्टर हा अभ्यास करून वैद्यकीय पदवी प्राप्त झालेला तुमच्या आमच्या सारखा व्यक्ती आहे . डॉक्टरांना जर आपण देव मानत असाल आणि डॉक्टरांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा ह्या अवास्तव असतील ,तर आपली निराशा होण्याची शक्यता जास्त असते! विज्ञाना शिवाय श्रेष्ठ जगामध्ये कुठली व्यक्ती नाही हे कायम लक्षात असणे गरजेचे आहे!! वैद्यकीय शास्त्र देखील त्याला अपवाद नाही ! अशा परिस्थितीमध्ये सर्व रुग्ण मित्रांनी आपला योग्य डॉक्टर निवडणे हे फार गरजेचे असते ,मात्र वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर डॉक्टरांची शोध करणे हे फायद्याचे नाही. अनेकदा डॉक्टर जर आपल्या एखाद्या जुनाट आजाराला बरे करू शकले नाहीत तर आपण बाबा-बुवा किंवा थोतांड गोष्टींकडे आपले मन वळवितो आणि बऱ्याचदा नको असलेल्या गोष्टी आपण करून बसतो! त्यातून दीर्घ कालीन नुकसानच होते .हे देखील रुग्णांनी जाणने फार गरजेचे आहे .बरेचदा रूग्णांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्य बद्दल देखील ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे .( गुगल वरील वैद्यकिय पदवी घेऊ नये ! ) आपण डॉक्टरांना योग्य ती माहिती पुरविणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते .बर्‍याचदा शहरी भागांमध्ये उपलब्ध असलेल्या डॉक्टरांची संख्या ही जास्त असल्या कारणाने तेथे सुपर स्पेशलिटी असले डॉक्टर सहज उपलब्ध होतात, मात्र ग्रामीण भागांमध्ये अशा पदवीत्तर किंवा सुपरस्पेशालीटी असलेल्या डॉक्टरांची उपलब्धता ही शक्य नसते ,अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य डॉक्टर निवडून शहराच्या दिशेने किंवा सुसज्ज हॉस्पिटल कडे जाणे हे वेळीच गरजेचे असते. अशा प्रकारचा अभ्यास किंवा आपल्या परिसरात असलेल्या वैद्यकीय परिस्थितीचा आढावा आपणास असेल तर आपल्यावर ती अचानक आलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण बरेचदा आपला प्राण वाचवू शकता किंवा आपल्या नातेवाईकांच्या , मित्रमंडीळींचा प्राण वाचवण्यासाठी आपण इतरांची मदत देखील करू शकतो. डॉक्टरांनी देखील आपल्या कार्याबद्दल सतत प्रमाणिक असणे गरजेचे आहे ,आपला रुग्णसेवेचे व्रत हा अविरत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरच देशाच्या आरोग्य वैद्यकीय व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालू शकेल. 


डॉ नेमाणे अ. वा .

(लेखक वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक, वक्ते आहेत.)

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे