दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते डॉ अमित नेमाणे यांचा लेख !

 दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते 

डॉ अमित नेमाणे यांचा लेख ! 



   नमस्कार मित्रांनो ! आपण आजवर अनेक विषयांवर चर्चा केली आहे , दातांच्या समस्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर माझे अनेक लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत .नुकतेच आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिनानिमित्त घेतलेल्या कर्करोग तपासणी शिबिराला आपण अगदी भरभरून प्रतिसाद दिला , त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार ! आजच्या विषयाकडे वळूयात......


   अनेक पेशंट , दंतरोग तज्ञांना विचारणार्‍या प्रश्नांपैकी एक अतिसामान्य प्रश्न म्हणजे , " डॉक्टर साहेब , दातांमध्ये अनेक फटी पडत आहेत ! काय करावे बरं ? " 

   सर्वप्रथम आपण दातांमध्ये फट पडण्याची कारणे बघूयात . काही कारणे नैसर्गिक असतात , म्हणजे नैसर्गिक दातांमध्ये फटी ( गॅप ) असणे याला स्पेसिंग असे म्हणतात. अशा केसेसमध्ये दातांना तारा लावणे / ब्रेसेस लावुन फटी बंद करता येतात . मुळात हा आजार नव्हे ! साधारण वर्षभराचा कालावधी लागू शकतो . हाडांची आणि दातांची अपरिपक्वता किंवा काही जणुकीय आजार ही देखील काही कारणे आहेत . आता पाहूयात पॅथॉलॉजिकल कारणे , पॅथाॅलाॅजिकल कारण म्हणजे दातांच्या आजारामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर दातांमध्ये फटी पडणे , याला आपण त्याचे पॅथाॅलाॅजिकल  कारणे म्हणू शकतो . उदाहरणार्थ एखादा दात काढलेला आहे मात्र त्या जागी पुन्हा कृत्रिम दात बसवून घेतला नाही , तर दात पडलेली मोकळी जागा उरलेले प्रत्येक दात वाटून घेतात किंवा त्या मोकळ्या जागेत इतर दात अतिक्रमण करतात , याला आम्ही पॅथॉलॉजिकल मायग्रेशन असे म्हणतो . अशा केसमध्ये  दात काढलेल्या जागी तात्काळ कृत्रिम दात बसवून घेणे गरजेचे असते याचे कारण म्हणजे दात जेवढा वेळ एकमेकांना चिटकून घट्ट असतात , तेवढ्या कालावधीसाठी कायमस्वरूपी घट्ट राहतात , मात्र त्यांचे आयुष्य देखील वाढते . एकीचे बळ हे दातांना देखील लागू होते . जसा माणूस समाजशील प्राणी आहे आणि तो जास्त काळ समाजापासून दूर राहू शकत नाही , त्याचप्रमाणे एकटाच दात किंवा दाढ इतर दातांपासून विभक्त राहत नाही . जर इतर दातांपासून दात किंवा दाढ वेगळा पडला , तर लवकरच तो हालुन पडण्याची शक्यता निर्माण होते . याच मुळे दातांमध्ये फट असतील , तर आपण तात्काळ दंतरोग तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

       आणखी एक गोष्ट मला इथे स्पष्ट करायची आहे , अनेक पेशंट विचारतात की , त्यांचा डाव्या बाजूचा किंवा उजव्या बाजूला दात दाढ काढल्यानंतर विरुद्ध बाजूस म्हणजे डाव्या बाजूचा दात काढल्यावर उजव्या बाजूचे दात दुखायला सुरुवात होते असे का? 

   पेंशट मित्रांनो , आपल्या दातांची संरचना भगवंतानी अतिशय सुंदर बनविली आहे . प्रत्येक दात एकमेकास पूरक असतो , प्रत्येक दाताच्या अस्तित्वाचा प्रभाव इतर दातांवर देखील स्पष्ट पहायला मिळतो .खालच्या आणि वरच्या जबड्यातील दातांची संरचना ही परस्पर पूरक असते , मात्र दातांमध्ये फटी पडल्यानंतर किंवा एखादा दात काढल्यानंतर , कृत्रिम दात बसविला नाही की , संपूर्ण जबड्याची संरचना बदलण्यास सुरुवात होते . सर्व दात होण्यापासून ते TMJ म्हणजे कान-जबड्याच्या सांध्यावर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो . आणखी एक बाब म्हणजे जबड्याच्या दोन्ही अर्थात उजव्या आणि डाव्या बाजूचा चावण्यासाठी वापर करणे हे अगदी नितांत गरजेचे असते . एका बाजूचा दात दुखण्या सुरुवात झाल्यानंतर आपण त्या बाजूने जेवन  न करता दुसऱ्या म्हणजे विरुद्ध बाजूने अन्नकन चावत असतो , असे दीर्घकाळ केल्यामुळे ज्या बाजूने आपण सतत जेवण करतो त्या बाजूचे जबड्याचे हाड झिजण्याची क्षमता वाढते आणि ज्या बाजूला आपण जेवत नाही त्या बाजूच्या हाडांच्या रचनेमध्ये बदल होतो . त्याचबरोबर ज्या बाजूने आपण सतत चावत असतो त्या बाजूची मस्क्युलर ऍक्टिव्हिटी ही जास्त असते आणि विरुद्ध बाजूची मस्क्युलर ऍक्टिव्हिटी ही कमी होते ,त्यामुळे ज्या बाजूचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करतो त्या बाजूच्या मसल्स डेव्हलप होतात , त्यामुळे चेहऱ्यामध्ये देखील अनियमितता दिसून येते . चेहर्र्याचे दोन भाग हे असमान असल्याचेही काही रुग्णांमध्ये स्पष्ट जाणवू शकते. 



  आता दातांचे आणखी महत्त्वाचे काम म्हणजे ,आपण बोलताना उच्चार केल्यावर जो वायू तोंडाच्या पोकळीत तयार होतो त्याला स्वरांची लयबद्धता देणे . आपण पाहिले असेल , दात नसलेल्या वयोवृद्ध लोकांचे शब्द उच्चार हे अगदी अनाकलनीय असतात , याच मुळे दातांमध्ये फट पडायला लागली की आपले शब्द उच्चार बिघडतात ,याचा पुरावा हे आपले श्रोते मंडळी असतात . उच्चार बदलामुळे आत्मविश्वास घसरतो , ही वेगळीच बाब !!  

  दात आपल्या गालांना आणि ओठांना विशिष्ट आकार देतात , आपण पाहिले असेल जर एखाद्या व्यक्तिला एक विशिष्ट दात नसेल किंवा एखादी दाढ काढली असेल , तर नेमक्या त्या पोकळीमध्ये गाल आत घसरल्याचे जाणवते आणि गालाला खड्डे पडतात . गालावरील खड्डे ही वृद्धपणा ओळखण्याची खूण म्हणून वापरायला काही हरकत नाही !  मात्र अकाली दात पाडून कृत्रिम दात न बसविल्यामुळे अनेक ताशी आणि चाळीशीतील वृद्ध मंडळी आमच्याकडे येतात किंवा समाजामध्ये इतस्ता फिरताना आपणास दिसतात . स्त्री रूग्णांना गालावरील खळी आणि खड्डा यांमध्ये फरक आहे हे समजणे महत्त्वाचे आहे !! 



 दातांमध्ये मध्ये फटी पडल्यानंतर सर्वात मोठी अडचण तयार होते , ती म्हणजे दातांमध्ये अन्नकण अडकून राहणे . जेवणानंतर आपणास टूथपिक ,काडी , उदबत्तीची काडी , पेपरची सुरळी ,किंवा नख दातांमध्ये घालण्याची गरज लागत असेल , तर आपण समजून घ्या की , आपली वाटचाल दातांच्या अनेक समस्यांच्या दिशेने चालू आहे . 


   अशा एक आणि अनेक दातांच्या समस्यांसाठी दंतरोग तज्ञाचा सल्ला घेणे , हेच एक शहाणपणाचे लक्षण आहे असे माझे अतिशय परखड मत आहे . 

                       लेखक 

               डॉ अमित नेमाणे               

         ( दंतरोगतज्ञ आणि वक्ते )

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे