आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू...............

 आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू ...............


                                डॉ. अमित नेमाणे


नमस्ते मित्रांनो ! आजचा लेख लिहिण्यासाठी  बरेच दिवस थांबावे लागले ,दरम्यान आपणा सर्वांचे निरोप येत होतेच ,त्याबद्दल धन्यवाद !! मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जातो , त्यावेळी अनेक लोक अनेक प्रश्न , शंका विचारतात , त्या सर्व प्रश्नांची , शंकांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी मला बरेचसे वाचन नियमित करावे लागते , तसेच वाचन करताना फार सुंदर कल्पना ,विचार सुचतात आणि तात्काळ त्यांपैकी एखाद्या विषयावर आपण लेख लिहावासा देखील वाटते , त्यापैकीच आजचा विषय म्हणजे " आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू...."

       साधारणतः कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वाशी बांधील असते , आपणा सर्वांना बरोबर देखील हेच असेल . उदाहरणादाखल आपल्या प्रत्येकाचा विशिष्ट स्वभाव ,विशिष्ट वागणे-बोलणे , पेहराव अगदी विशिष्ट DNA प्रमाणे  एकमेवद्वितीय असते. प्रत्येकाची एक विशेष ओळख असते .जसे आक्रमक खेळाडू म्हटले की विराट कोहली डोळ्यासमोर येतो किंवा शरद पवार यांचे नाव घेतले की मुरब्बी राजकारणी , मग त्यांची बोलण्याची , राहण्याची छबी देखील स्पष्ट डोळ्यासमोर दिसते .आपल्या मित्रपरिवारा मध्ये देखील प्रत्येक व्यक्ती हा एक विशिष्ट व्यक्तीमत्वाचा धनी असतो .थोडक्यात सांगायचे असते की अनेक वर्ष आपण एक विशिष्ट,  मात्र त्या त्याच पद्धतीचे बोलतो , वागतो , खातो , पेहराव करतो , अगदी वर्षं वर्ष आपण तीच गोष्ट सातत्याने करतो आणि ती आपली ओळख बनत असते. 

ज्या लोकांना त्यांच्या या विशिष्ट व्यक्तिमत्त्वामुळे आयुष्यात यश ,समाधान, कीर्ती मिळालेली असते,  त्यांच्याबद्दल मुळातच माझे काही म्हणणे नाही ......मात्र ज्या लोकांना यश मिळाले नाही असे वाटते ,समाधान वाटत नाही किंवा आयुष्याच्या एका विशिष्ट कंफर्ट झोन मध्ये असल्याचे वाटते , त्यांनी हा कम्फर्ट झोन सोडायला हरकत काय ?? हाच लेखाचा मुद्दा ....स्वतःला शोधणे हे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती शक्य आहे !! मात्र स्वतःला शोधायचे म्हणजे काय करायचे ??        थोडक्यात एक उदाहरण सांगतो , मी अनेकदा यु ट्यूब वरती मोटिवेशनल व्हिडिओ वैगेरे बघत असतो , दरम्यान एक वक्ता सतत उदाहरण देत होता की , सचिन तेंडुलकरला त्याच्या पालकांनी गायला सांगितले असते तर काय ? किंवा लता मंगेशकर ला फास्ट बॉलिंग करायला सांगितली असती तर काय ? लता मंगेशकर घडल्या असत्या ? किंवा सचिन तेंडुलकर घडले असते ? .......मित्रांनो , इथेच माझ्या लेखाचा मुद्दा आहे की , आपण जे आयुष्यात जगलो नाही , जे केले नाही ते करून बघायला हरकत काय ? करून बघितले तर कदाचित आपली स्वतःची एक नवी ओळख आपल्याला होऊ शकेल असे नाही का वाटत तुम्हाला ? ..अनाहुतपणे लक्षात आलेला आपला स्वतःमधील एखादा गुण , आपणास आयुष्यात पुढे घेऊन जाऊ शकेल याची अनेक मूर्तिमंत उदाहरणे आहेत . जिंदगी मे कुछ भी हो सकता है असे म्हणणारा अनुपम खेर कदाचित हेच तर सांगत नसेल ना ?!!

      अगदी उकल करून सांगतो , समजा सचिन तेंडुलकरने एखादे छानसे गाणे गळा कडून सुरात जरी नाही गायले , तरी त्याने गाणे गायले , कदाचित त्याला आनंद झाला असेल !! कदाचित त्याच गायनाच्या आनंदामुळे त्याने क्रिकेटमध्ये अनेक शेतकी खेळ्या केल्या असतील तर !!? हो , हे शक्य आहे !  एखादी गोष्ट केवळ आपल्याला येत नाही किंवा शोभत नाही म्हणून करायची नाही असे कोणी सांगितले आहे का ? किंवा असा कुठला नियम आहे का?

         मुळात आपण केवळ विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहोत , म्हणून वाणिज्य शाखेचे पुस्तक वाचायच नाही असा कुठला अलिखित नियम आहे का ? किंवा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे किंवा इतर कुठल्याही विषयातलं पुस्तक वाचलेच नाही तर त्याला त्या विषयांमधील ज्ञानप्राप्ती होणार नाही हे सत्य आहे , या वर आपलं एकमत असेल . त्यामुळे ही विशिष्ट पुस्तके माझ्यासाठी आहे किंवा नाही , हा विशिष्ट पेहराव माझ्यासाठी आहे किंवा नाही , विशिष्ट जागा ,  हे विशिष्ट लोक माझ्या योग्यतेचे आहेत किंवा नाही , असे म्हणून आपण जे वर्षानुवर्षे जगत आहोत याला तडा द्यायला काय हरकत आहे !? कदाचित आपली स्वतःची आपणास नवी ओळख होईल असे आपल्याला वाटत नाही का ?? 

     अनेक चित्रपटांमध्ये देखील बऱ्याच निर्मात्यांनी हा विषय मांडला आहेच की !! एक मोठा उद्योगपती त्याच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक वेगळाच दिवस म्हणून , जे कधीच केले नाही असा एक दिवस जगतो , म्हणजे अगदी एरवी कधीही न घालू शकणारा अतरंगी शर्ट घालून , पायी चालत गाडीमधून कधीही खाली न उतरणारा तो , अगदी चोवीस तास रस्त्यावर फिरत असतो . कधीही न खाल्लेल्या गोष्टी खातो , कधीही न बोललेल्या लोकांबरोबर गप्पा मारतो , असे बरेच काही करतो आणि त्याला त्या एका उनाड दिवसाचा अभुतपुर्व आनंद मिळतो . 

        आपल्या प्रत्येकाचे आयुष्य ही नाण्याची एक बाजू असते , मात्र प्रत्येकाच्या आयुष्याला नाण्याची दुसरी बाजू देखील असते . आपण कधीही न जगलेली किंवा विचारही न केलेली असते . एक इंग्रजी लेखक त्याच्या एका पुस्तकात सांगतो की आपल्याला स्वतःची ओळख जर करायची असेल , तर आपण सातत्याने अशी एखादी गोष्ट केली पाहिजे जी आपणा स्वतःला बिलकूल आवडत नाही किंवा आपण ती कधीही करत नाही ." The Success Allways Lies  Beyond One's Comfort zone ! "  असेही एक वाक्य माझ्या वाचण्यात आले आहे. 

       मित्रांनो आपण आपल्या सभोवताली एक विशिष्ट वातावरण बनवीत असतो , ज्यात आपण कायम आरामदायी ( थोडक्यात ,कम्फर्टेबल हा इंग्रजी शब्दाचा जास्त भावार्थ येथे विचारात घेणे ) या अशा विशिष्ट कंफर्ट झोन मधून बाहेर पडणे हेच तर आयुष्याच्या खऱ्या विलक्षण अनुभवाला फोडणी देणारे आहे.... त्यामुळे अशा सर्व व्यक्ती ,विद्यार्थी ,युवा ( वय वाचक नव्हे , व्यक्तिवाचक युवा ) ज्यांना आयुष्यात काही काम करायचे आहे किंवा आयुष्य आणि स्वतःला जाणून घ्यायचे आहे , त्या प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन तोडून काहीतरी केलेच पाहिजे . आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते मात्र ती आपणास अभासी असते . जोपर्यंत तुम्ही ही दुसरी बाजू चाचपडत नाही , तोपर्यंत आयुष्याचा परमोच्च आनंद आपणास मिळणार नाही ! हे तितकेच खरे .

       अगदी ह्याच मुळे आपण सर्वांनी सतत अशक्य गोष्टी आत्मविश्वासाने केल्या पाहिजेत . नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत . अमुक गोष्ट ही माझ्यासाठी नाही , मुळात हा गैरसमज मनातून दूर केला पाहिजेल .प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची सवय आपणास लागली पाहिजेल . अर्थात योग्य गोष्टींविषयी मित्र इथे बोलत आहे . मला जे जे जमते तेच मी करतो यात विशेष काही नाही , मात्र मला जे जमत नाही ज्याची मला भीती वाटते आणि जे करण्यास योग्य आहे ते मी करतो , यात विशेषतत्त्व आहे आणि व्यक्ती म्हणून मी अशा वेळेस सत्कार प्राप्त असतो. 

     आयुष्याच्या नाण्याची ही दुसरी बाजू जर आपण चाचपडून पाहिलीत , तर तेथे कदाचित अद्वितीय आनंद आपणास प्राप्त होऊ शकेल , हे मात्र अगदी खरे वाटते !! आपले यावरती काय मत आहे ?? 

              डाॅ अमित नेमाणे 

    ( व्याख्याते आणि दंतरोग तज्ञ )

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे