आपला चार्जिंग पॉईंट ! - डाॅ नेमाणे अमित
आपला चार्जिंग पॉईंट !
- डाॅ नेमाणे अमित
वाचक मित्रांनो ,आज आपण स्वतः ला प्रोत्साहित ठेवण्याबद्दल बोलूयात ! प्रत्येकाची काही स्वप्ने असतात ,प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं , तर काही बनायचं असतं . हेच ते काहीतरी मिळवायचं ज्या वयात आपण ठरवतो ,तेव्हा आपाल्यामध्ये असलेला मानसिक ,शारीरिक ऊर्जा स्त्रोत देखील अथांग, अफाट असतो . मात्र जसजसे दिवस जातात ,महिने जातात , वर्ष उलटून जातात ,तेव्हा ती ऊर्जा कमी होते आणि आपल्या आयुष्यात जे हवे होते , जे करायचे होते ती गोष्ट मागे पडते , एक वेगळेच येवून ठेपलेले आयुष्य आपण जगत रहातो . असे काहीसे आपल्याला बरोबर झाले आहे का ?? किंवा आपल्याबरोबर होते का ? ८५ टक्के लोकांचे उत्तर होय असेच असेल !! कारण हाच ८५ टक्के समाज आहे , जो नियमित आपल्या नजरेस पडतो . अचानक आठवलं म्हणून नमूद करतो , परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय चळवळीचे प्रसारक आणि भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक होते , ते असं म्हणतात की समाजामध्ये ८५ टक्के लोक हे अनुकरण करणारे म्हणजेच फॉलॉवर असतात आणि उरलेल्या टक्क्यांमध्ये १५ टक्के यशस्वी ,प्रगतिशील ,प्रामाणिक ,तत्ववादी ,विचारी लोक असतात , तर उरलेले १५% नाठाळ प्रवृत्ती दुर्विचारी स्वरूपाचे असतात . आता गंमत अशी आहे की , ८५% अनुकरण करणारा जो समाज असतो , त्यांनी या लबाड ,नाठाळांचे अनुकरण केले की ८५ + १५ = १०० टक्के समाज नाठाळ होते आणि त्याच ८५ % लोकांनी प्रामाणिक ,विचारी लोकांचे अनुकरण केले तर १०० टक्के समाज विचारी ,संयमी बनतो .त्यामुळे आपण केवळ विद्वत्तेने जगणे महत्वाचे नसून , आपले सुविचार इतरांना देणे हे देखील तेवढेच गरजेचे असते , तरच समाज विचारी बनतो आणि इतिहासात त्याची नोंद घेतो . असो ! आपल्या विषयाकडे वळूयात.......
जी गोष्ट आपल्याला हवी आहे , जे आपल्याला करायचे आहे , जे आयुष्यात बनवायचे होते , ते मागे सुटले आहे का ?? किंवा आपण आयुष्यात दुसरेच काही करतो आहोत का ?? " जे आवडते ते केले पाहिजे आणि जे करतोय ते आवडले पाहिजे , तरच आयुष्यात यशस्वी झाल्याचा विश्वास आपणास प्राप्त होईल ! " मात्र समाजातील अनेक घटकांशी चर्चा केल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली , ती म्हणजे आयुष्यात जे साध्य करायचे होते ते विसरले , आणि जे साध्य ती मंडळी करीत आहेत त्यात त्यांना विशेष रूची नाही , याचा अर्थ मानवीय उत्पादनक्षमता घेण्यात होतो . युवा वर्गातील ऊर्जा वाया जाते , ती देखील याच कारणामुळे आणि भौतिक विज्ञान आपल्याला शिकविते ही ऊर्जा कधीही लोप पावत नाही , केवळ एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात ऊर्जा वाहते आणि हीच योग्य न वापरली गेलेली ऊर्जा समाजविघातक कृत्यां मधून बाहेर पडते , म्हणून मित्रांनो ऊर्जेचा योग्य वापर करणे नितांत गरजेचे असते.
आपलिया आयुष्यात जे आपल्याला साध्य करायचे आहे त्यात यशस्वी न होण्याची कारणे बघूयात ; साधारणतः एखादे उदाहरघेऊ समजा एखाद्या विद्यार्थ्याला अगदी कळत्या वयापासून डॉक्टर , वकिल , अभियंता बनण्याची इच्छा आहे मात्र पुढे जाऊन तो डॉक्टर वकिल किंवा अभियंता व्यतिरिक्त ईतर काही ( माझा हेतू कुठल्याही कामाला नावे ठेवण्याचा हेतू नाही ) काम करू लागला , तर असे का झाले असेल ?? कदाचित केवळ स्वप्न पाहणे आणि त्याची मजा अनुभवली मात्र प्रत्यक्षात यासाठी कोणताही योग्य जोडीदार ,मित्र ,सवंगडी न निवडणे , आवडत्या क्षेत्राविषयी कोणतीही माहिती न मिळविणे , आवडत्या क्षेत्रातील तज्ञांनी न भेटणे , डॉक्टर किंवा इतर काही तज्ञ बनण्यासाठी लागणारी मेहनत न करणे , केवळ रात्रीचे स्वप्न बघितल्याप्रमाणे ते बघणे , जे हवे त्यासाठी प्रयत्न न करणे , अशी अनेक कारणे असू शकतील .
दुसरे उदाहरण बघुया , एखाद्या विद्यार्थी आयएएस /आयपीएस होण्याचे स्वप्न बघतो , आपण अगदी चार-पाच वेळा परीक्षा देऊ शकतो , असे काहीसे त्याच्या लक्षात येते आणि तो सर्व प्रयत्नात आपण एकदा तरी परीक्षा उत्तीर्ण होऊ अशी आशा करतो , मात्र अगदी जोमाने सुरुवात केलेली गोष्ट पुढे जाऊन त्यातला रस कमी होणे किंवा सतत स्वतःला चार्जिंग न करणे या पातळीपर्यंत पोहचते , साधारणतः पाचशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अगदी जोमाने सुरू केलेला धावपट्टु , हा २०० मीटर पहिल्या क्रमांकावर पळाल्यानंतर , मध्येच धावन्याची स्पर्धा सोडून स्विमिंग (जलतरण )स्पर्धेत जाऊन पोहोचतो , असे काहीसे चित्र धावपट्टी स्वरूप आयुष्याचे होते.
कधी अज्ञात ठिकाणी शांत बसून विचारांची तार लागल्या नंतर कळते , की आपल्या आयुष्यात करायचे काय होते आणि आपण करीत काय आहोत ? !
मध्यंतरी मला एक सद्गृहस्थ भेटले , त्यांचा एक जगावेगळा छंद होता तो म्हणजे , मंत्री ,आयएएस /आयपीएस अधिकारी ,मोठे डॉक्टर ,वकील ,कंपन्यांचे मालक ,मोठमोठे कलाकार यांना भेटण्याचा , यांच्याशी किमान दोन वाक्यांचा संवाद साधण्याचा . ते यासाठी प्रचंड उहापोह करतात आणि ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात . या अनोख्या छंदाचे वर्णन अनेक वर्तमानपत्रात देखिल आले आहे , असे त्यांनी मला पुराव्यानिशी दाखविले . मला न राहून मी त्यांना एक प्रश्न विचारला की , आपण या सर्व यशस्वी लोकांची भेटण्यात काय एवढी धन्यता मानतात ?? , तर त्यांनी त्याचे फार सुंदर उत्तर दिले ते म्हणाले की , " सर माझे वय 60 वर्षे आहे ! परंतु मला स्वतःला स्व कर्तृत्ववान मोठ्या पदावर गेलेले लोक फार आवडतात ! मी जेव्हा अशा लोकांना भेटतो , तेव्हा माझी उर्जा , शक्ती द्विगुणित होते , त्यांची एनर्जी मला ट्रान्सफर होते आणि आयुष्यात जगताना एक नवीन खुमारी तयार होते !! " या उत्तराने मला
" चार्जिंग पॉइंट " ची कल्पना सुचली ! आयुष्य प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी चार्जिंग पॉईंट लागतो . जी व्यक्ती स्वतःला नियमित सकारात्मक चार्ज करते , ती कायमस्वरूपी यशाच्या दिशेने प्रवास करते . आता हा चार्जिंग पॉईंट काय असतो ? तर तो म्हणजे एखादे सुंदर व्याख्यान ,एखादा सुंदर व्हिडिओ ,एखादा चांगला चित्रपट, एखादे चांगले पुस्तक ,एखादा चांगला मित्र ...किंवा काही जेथून सकारात्मक ऊर्जा मिळते , तेथून सतत ही ऊर्जा मिळविने गरजेचे असते , तरच आपण आयुष्यात काहीही प्राप्त करू शकतो . ती व्यक्ती धेय्य वेडी आहे , असे आपण काही यशस्वी लोकांबद्दल ऐकत असतो , याचा अर्थ ती व्यक्ती सतत सकारात्मक ऊर्जा असणारी असते , म्हणून ती विशिष्ट सकारात्मक धेय्याचा पाठलाग करीत असते .
वाचक मित्रांनो , वरील लेखातून मला एवढेच नमूद करायचे आहे की , प्रत्येकाने स्वतःला सकारात्मकतेने प्रोत्साहित केले पाहिजे . तरच आपण आयुष्य कोणतीही गोष्ट यशस्वीपणे प्राप्त करू शकतो .स्वतः प्रोत्साहित असणे आणि इतरांना सकारात्मक उर्जा देणे ही काळाची गरज आहे , हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला शिका आणि वाचणार्या प्रत्येकाने आपण स्वतःला सकारात्मक प्रोत्साहन कसे देतो ? , याचा विचार केला पाहिजे !! तुम्ही स्वतःला सकारात्मक कसे ठेवता ? काय आहे तुमचा चार्जिंग पॉइंट ?? लिहीते व्हा !!
- डाॅ नेमाणे अमित
( व्याख्याते आणि दंतरोग तज्ञ )
Comments
Post a Comment